जिल्हा प्रशासनाला २ संघटनांची निवेदने

जळगाव ( प्रतिनिधी ) – वेळेचा काहीच विचार न करता ढोरमेहनत करावी लागत असलेल्या कोरोना लसीकरण कर्मचाऱ्यांना मानसिक तणावातून वाचवा अशी मागणी करणारी निवेदने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित आरोग्य कर्मचारी संघटना आणि राज्य जिल्हा परिषद बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिली आहेत .
या निवेदनांमध्ये म्हटले आहे की , हे कर्मचारी कोरोना लसीकरणासाठी नोव्हेंबर २०२० पासून रात्रदिवस काम करीत आहेत . त्यांना तालुकास्तरावर सर्वत्र कामांची सक्ती केली जाते आहे . कडक कारवाईचा दबाव टाकला जात आहे . त्यांना कोरोना लसीकरणातून वेळ मिळत नसल्याने अन्य योजनांच्या कामांवर लक्ष देता येत नाही हे वास्तव आहे . त्यामुळे कोरोना लसीकरण पूर्ण होईपर्यंत अन्य योजनांची कामे स्थगित करावीत . लस देणारे प्रशिक्षित लोक नेमून मनुष्यबळ वाढवावे त्यासाठी राज्य सरकारने दिलेला इन्सेंटिव्हमधील निधी खर्च करावा . जळगाव जिल्ह्यात असे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत . महिला कर्मचाऱ्यांना रात्री १० वाजेपर्यंत कामाची सक्ती केली जाणे अन्यायकारक आहे . या कर्मचाऱ्यांना मोबाईलचा खर्च दिला जावा . या कर्मचाऱ्यांचे मार्च -२० पासून सेवाविषयक लाभ प्रलंबित आहेत ते तात्काळ मंजूर करावेत.







