पोलिसांचा सौम्य लाठीमार आणि पत्रकारांना धक्काबुक्की
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आर. एल. चौफुलीजवळ असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरू असताना फेरमतमोजणीच्या मागणीवरून मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला, ज्यामध्ये काही पत्रकार आणि राजकीय नेत्यांनाही धक्काबुक्की झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?
सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतमोजणीत दुपारी चार वाजेच्या सुमारास फेरमतमोजणीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. ‘उबाठा’ गटाचे उमेदवार आणि जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली असता, प्रशासन आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याचे पडसाद मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमटले आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

पोलिसांची कारवाई आणि दगडफेक
वाढती गर्दी आणि गोंधळ पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा अवलंब केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांकडून किरकोळ दगडफेकीचा प्रकारही घडल्याचे समजते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत केवळ कार्यकर्त्यांनाच नाही, तर वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना (पत्रकारांना) देखील धक्काबुक्की झाली. यामुळे सर्व पत्रकार संघाने पोलिसांच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आहे.

राजकीय नेत्यांना धक्काबुक्की
मिळालेल्या माहितीनुसार, फेरमतमोजणीची आग्रही मागणी करणाऱ्या कुलभूषण पाटील यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की करून मारहाण केली. असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना कुलभूषण पाटील यांनी केला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

प्रशासनाचा निषेध
निवडणूक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या दडपशाहीचा निषेध करत अनेक उमेदवारांनी मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या मांडला. सद्यस्थितीत मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे.









