जळगाव { प्रतिनिधी ) – महापालिकेत प्रभाग समितीच्या निवडीत व्हीपचे उल्लंघन केल्यामुळे अपात्र करण्यात का येऊ नये? यासाठी आज विभागीय आयुक्तांनी भा ज प च्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपच्या फुटीर गटातर्फे गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर निर्णय देतांना ही नोटीस बजावण्यात आल्याची बाब लक्षणीय असून याचा महापालिकेतील आगामी राजकारणावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भाजपत फूट पडून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन तर उपमहापौरपदी भाजपतील फुटीर गटाचे नेते कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली.
दरम्यान, आपल्या गटाकडे सर्वाधीक ३० नगरसेवक असून पक्षाचे सभागृहातील गटनेता हे दिलीप पोकळे असतील असे पत्र देखील या गटातर्फे देण्यात आले.
मध्यंतरी झालेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या सर्व सदस्यांसाठी व्हीप बजावला होता. भाजपच्या २७ नगरसेवकांनी याचे उल्लंघन केले. यामुळे दिलीप पोकळे आणि कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या व्हिपचे उल्लंघन केले असल्याने त्यांना अपात्र करावे अशा मागणीचा अर्ज केला होता.
या अर्जावर निर्णय देतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांना अपात्र का करण्यात येऊ नये ? अशी विचारणा केली आहे. आज ही नोटीस बजावण्यात आली असून संबंधीत नगरसेवकांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.







