जळगाव मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार
हरकती-सूचनांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत; १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी
जळगाव प्रतिनिधी शहर महानगरपालिकेच्या २०२५ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा (प्रारूप प्रभाग रचना) आज, ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी ३ ते १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या काळात आलेल्या सर्व सूचनांवर जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त केलेले अधिकारी १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेतील.
प्रभाग रचना तयार करण्यासाठी आठ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आराखडा तयार करून तो राज्य सरकार आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे छाननीसाठी पाठवला होता.निवडणूक आयोगाच्या छाननीनंतर हा आराखडा पुन्हा जळगाव महापालिकेकडे आला आणि आज तो नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे.नागरिक आपली तक्रार किंवा सूचना मनपा आयुक्त कार्यालय किंवा प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ च्या कार्यालयांमध्ये दररोज दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करू शकतात. सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना तयार केली जाईल आणि ती नगरविकास विभागाला सादर केली जाईल.
हरकती व सूचना स्विकारल्यानंतर पुढील कार्यवाही करणे करीता मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नगररचनाकार अमोल पाटील, रचना सहाय्यक समिर बोरोले, विजय मराठे, अतुल पाटील, कनिष्ठ अभियंता योगेश वाणी, लिपीक हिमांशू भावसार, संदीप अत्तरदे यांच्यासह चारही प्रभागा अधिकारी, लिपीक रामेश्वर चकणे, समाधार बारी, बळीराम सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी या संदर्भात लेखी आदेश जारी केले आहेत.