शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी मणक्याचे आजार : निदान व उपचार याविषयी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी लाभ घेण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या अस्थीव्यंगोपचार विभागातर्फे हाडांचा ठिसूळपणा या संदर्भामध्ये नियमित तपासणी सुरू असते. आता मणक्याचे आजार या संदर्भामध्ये मुंबई येथील स्पाईन फाउंडेशनच्या टीमने जळगावच्या रुग्णालयात सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी ज्या रुग्णांना कमरेचे दुखणे, सायटिका, स्पॉंडीलाइटिस, स्लिप डिस्क, कमरेच्या वेदना, पायाला सारख्या मुंग्या येणे असे मणक्याचे विविध आजार असतील तर त्यांनी तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात सकाळी १० ते १ या वेळेमध्ये कक्ष क्रमांक ११५ या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे.
तपासणी दरम्यान गरजू रुग्णास जर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली तर शस्त्रक्रिया देखील करून मिळणार आहे. शस्त्रक्रियेसाठी दोन आठवडयांनी मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन व टीम रुग्णालयात येणार आहे. रुग्णांनी मणक्याच्या दुखण्यासंदर्भात आयोजित तपासणी शिबिराला उपस्थिती द्यावी, असे आवाहन अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जोतीकुमार बागुल यांनी केले आहे.