आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
चाळीसगाव – नवनिर्वाचित ग्रामपंचायतीना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) साठी ग्रामसभा घेता येत नसल्याने ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करता येत नव्हती. त्यामुळे पोकरा योजनेत असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे विविध शेतीपूरक अनुदान प्रकरणे रखडली होती.
याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांना पत्राद्वारे सूचित करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची जाणीव करून दिली होती. त्यानंतर जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी या विषयात लक्ष घालून शासनाकडे पाठपुरावा केला असता नुकताच शासनाने ऑनलाइन विशेष ग्रामसभा घेऊन नवीन ग्राम कृषी संजीवनी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून या धोरणात्मक निर्णयाचा फायदा महाराष्ट्र राज्यातील पोकरा योजनेत असणाऱ्या सर्व गावांना होणार आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची काळजी घेणारा शेतकरीपुत्र आमदार आपल्या चाळीसगावकराना लाभला असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्यातून येत आहे.