भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील साकेगाव येथील विठ्ठल मंदिराची पाठीमागची खिडकी उघडून अज्ञात चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे मणी लांबविले. याबाबत भुसावळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
साकेगावात भोळे गल्ली येथे विठ्ठल रखुमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात पूजा, अर्चना, पाठासाठी जात असतात. या मंदिराला कमलबाई निवृत्ती पाटील यांनी ६ नोव्हेंबर २०१४ रोजी दागिने भेट दिले होते. मंदिरासमोरील रहिवासी नीता राजेंद्र नेहते या सकाळी ५ वाजता नित्यनेमाने देवदर्शनासाठी जात असतात. शुक्रवार मंदिरातील पाठीमागील खिडकी उघडी पाहून नेहते यांनी गावात घटना सांगितली. मंदिराचे संचालक संजय पाटील, संतोष भोळे, गोविंदा भोळे, राजेंद्र नेहते, नीता नेहते, शोभा चौधरी, तसेच मंदिराचे पुजारी देवीदास कोळी व अमोल गोविंदा कोळी आदींनी मंदिराची पाहणी केली. देवीच्या गळ्यातील दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे मणी चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत.