ज्यांचे भाव शुद्ध असतात, ते पाण्यावर असलेल्या नावेप्रमाणे वर तरंगत असतात, ज्यांच्यात शुद्ध भाव असतात तेच या भवसागरात तरतात. ज्याची जशी भावना असते त्याला त्या प्रमाणे फळ प्राप्त होतात. भाव खालच्या पातळीचे नसावे ते उच्च पातळीचे असावेत. मानव जन्म आणि शुद्ध भाव एकत्र होणे हा दुर्मिळ योग असतो हा योग जुळून येणे म्हणजे कल्याणच कल्याण होय त्यामुळे प्रत्येकाने भाव शुद्ध ठेवावा असे आवाहन परमपुज्य सुमित मुनीजी महाराज यांनी केले.
शुद्ध भावना आणि शुद्ध विचार आपल्या जीवनाला सकारात्मक दिशेने घेऊन जातात. भाव शुद्धी साध्य करायची असेल तर भक्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. चांगल्या व शुद्ध भावना ठेऊन कर्म करणे गरजेचे असते कारण भाव बिघडले तर भव देखील बिघडत असतात. शुद्ध भाव असतील तर पाप नष्ट होतात. कितीही पूजा पाठ केले आणि मनात शुद्ध भाव नसतील तर त्या पूजा पाठ केल्याचे फळ मिळत नाही, त्याचा काहीही एक उपयोग होत नाही. भावनाच्या बाबत दरिद्री मुळीच बनू नका हा विषय स्पष्ट करताना त्यांनी एक महिला व नारदजींची गोष्ट सांगितली.
भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर ९८० वर्षांनी देवर्धिगाणी क्षमाश्रमाने यांनी आमगमांचे लिखीत स्वरूपात संकलन केले, तेव्हापासून आगम लिहिण्याची परंपरा सुरू झाली. आचार्य देवर्धिगणी क्षमाश्रमण यांनी ८४ आगम लिहून ठेवले होते, परंतु कालांतराने अनेक आगम आपोआप नष्ट झाले. आता ते ३२ इतके राहिलेले आहेत. त्यातील काही आगम इतके प्रभावशाली होते की त्यांचे स्मरण करून देवता येत असत. त्याबाबतचा अत्यंत माहितीपूर्ण इतिहास आपल्या प्रवचनातून परमपुज्य भूतीप्रज्ञ महाराज यांनी सांगितला.