जळगांव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत पथदिवे बसविणे, कोविड खर्च, मलेरिया निर्मूलनासाठी उपाययोजना याविषयी चर्चा घडून आली. अँड. शुचिता हाडा यांची सभापती म्हणून शेवटची सभा होती.

महानगरपालिकेत बुधवारी ३० रोजी दुपारी सभापती अँड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली अखेरची स्थायी सभा ऑनलाईन पध्दतीने झाली. सभेत फारसे विषय नसल्याने कुठलाही गाजावाजा न होता पार पडली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मनपा फंडातून व विविध विकास कामांसाठी प्रभागासाठी पोल मिळणार काय? अशी मागणी शिवसेना नगरसेवक नितीन बरडे यांनी केली. यावर आयुक्त यांनी होकार दिला. फंडाची रकम सर्व नगरसेवकांना विविध कामांसाठी मिळणार असे आयुक्तांनी जाहीर केले. कोविडविषयी सर्व खर्च हा १४ व्या वित्त आयोगातून व त्याच्या व्याजातून खर्च करता येणार नाही. शासनाचे १४ सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार त्यापूर्वीच्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करावा. १० वा, ११ वा, १२ वा व १३ वा वित्त आयोगातून हा निधी खर्च करण्यात येईल असे मुख्य लेखापरीक्षक कपील पवार यांनी स्पष्ट केले.
मनपाची कोट्यवधीची मशिनरी धूळखात पडली आहे, कवडीमोल भावात ही मशीनरी जाणार अशी स्थिती मशिनरीची झाल्याचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सभागृहासमोर मांडले. तसेच १५,००० रुपयासाठी जेसीबीचे टायर टाकले जात नाहीत, वर्षभर प्रस्ताव तसेच पडून राहतात. याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. ३ महिन्यात शहरात मलेरिया फवारणी करायची असे ठरले. त्यानुसार या कामासाठी मनुष्यबळ नियुक्त करणे, शहरात फवारणी करणे ही कामे प्रामाणिकपणे झाली पाहिजेत. ही कामे करतांना संबंधित नगरसेवकांना कामे केल्याचे दाखवले पाहिजे. नगरसेवकांना सर्व माहिती कळविली पाहिजे अशी सूचना राजेंद्र घुगे पाटील यांनी दिली व व हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.
काही अधिकारी कामांत दिरंगाई करतात, काही कामे जाणीवपूर्वक थांबवून ठेवतात व सदस्यांना नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. अधिकारी मात्र मोकळे होतात, त्यासाठी जेव्हा हे अधिकारी निवृत्त होतात तेव्हा आयुक्तांनी त्यांच्या कामांचे मूल्यमापन केले पाहिजे असा सूचक इशारा अँड. हाडा यांनी यावेळी दिला. सभेत स्थायी सभेचे कार्यवृत्त कायम करणेसह आयुक्तांच्या संविदांची माहिती घेणे, यात दि. १६ सप्टेबर आ. चंदूलाल पटेल यांच्या निधीतून विद्युत विभाग यु. क्र. १ अंतर्गत पटेलवाडी शिवाजीनगर १, मुक्ताईनगर दत्तगार्डन ४, तर वार्ड क्र. १६ वर्षा कॉलनी दत्त मंदिरासमोर, गणेशवाडीत गणेश राणे यांचे घरासमोर असे २, तर शिवराम नगर येथील आनंद हौसिग सोसायटी येथे १ व पार्वतीनगर ओपन स्पेस येथे १ तसेच विविध ठिकाणी ९ नग सोलर स्ट्रीट लाईन उभारुन लाईट व्यवस्था करणे कामी मक्तेदार भूषण इलेक्ट्रीकल्स यांचे अंदाजित रकमेइतकेच दर स्विकारुन रकम ५ लाख ९५ हजाराच्या खर्चास मंजुरी देणे तसेच डेंग्यू डास प्रतिबंधासाठी शहरात मनपा मलेरिया विभागातर्फे फवारणी करण्यासाठी ३ महिने, ७० लाखाच्या खर्चास मंजुरी देणे या विषयावर चर्चा होवुन त्यावर मंजुरी सर्वानुमते घेण्यात आली. सभेत एक प्रशासकीय प्रस्ताव व एक जोड पत्राचा विषय अशा दोन विषयांवर चर्चा होवून ते संमत झाले.
सभेत सभापती हाडांसह आठ सदस्य निवृत्त झाले. सभागृहात स्थायी सभापतींच्या कार्यकाळाचे विरोधक तसेच प्रशासनासह सर्वांनीच कौतुक केले. पारदर्शी कामकाज व सर्वांना सोबत घेवून चालण्याची पध्दत याचे सर्वांनी कौतुक केले. सभापतींच्या कार्यकाळात २४ तासात ठरावावर सह्या करुन प्रशासनास सुपूर्द करणे, अपवाद वगळता सर्व ठराव एकमताने मंजूर झाले.







