खंडणीखोर दोघा तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; अकोल्यात जळगाव पोलिसांची धडक कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव रचून एका मोबाईल व्यापाऱ्यासह त्याच्या भाच्याचे अपहरण केल्याची थरारक घटना जळगावात उघडकीस आली आहे. २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी या दोघांना अकोला येथे डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, जळगाव पोलिसांनी अत्यंत चपळाईने तपास चक्रे फिरवत पहाटेच आरोपींना अकोल्यातून ताब्यात घेतले.


गोलाणी मार्केटमधील मोबाईल साहित्य विक्रेते कृष्णकुमार चौधरी आणि त्यांचा भाचा गणपतलाल माली १५ फेब्रुवारीच्या रात्री घरी जात असताना हा प्रकार घडला. मुख्य संशयित आरोपी यश जितेंद्र माकोडे याने ‘तुमचे राजस्थानवरून पार्सल आले आहे’ असे सांगून भाचा गणपतलाल याला ममुराबाद रस्त्यावरील एका इमारतीत बोलावून घेतले. तिथे गेल्यावर गणपतलालला बांधून ठेवून चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर मामा कृष्णकुमार यांनाही तिथे बोलावून घेत दोघांनाही शस्त्राचा धाक दाखवून डांबले.
“तू मला मारण्याची सुपारी दिली आहेस,” असा बनाव रचून आरोपीने दोघांनाही दुचाकीवरून नेले. यावेळी एका अल्पवयीन मुलाचीही मदत घेण्यात आली. दोघांनाही अकोला येथे नेल्यानंतर, भाच्याला सोडवण्यासाठी आरोपीने २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे आणण्यासाठी आरोपीने मामा कृष्णकुमार यांना जळगावात परत पाठवले. मात्र, घाबरून न जाता कृष्णकुमार यांनी थेट शनिपेठ पोलीस स्टेशन गाठले आणि हकीकत सांगितली.
घटनेचे गांभीर्य ओळखून शनिपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने अकोल्याच्या दिशेने कूच केली. रविवारी पहाटे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या आणि अपहृत तरुणाची सुटका केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. व्यापाऱ्याने दाखवलेले प्रसंगावधान आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत केलेली कारवाई यामुळे मोठी अनर्थ टळला आहे.









