यावल तालुक्यातील पिंप्री येथील घटना
वैष्णवी विनोद तायडे (वय १८, रा. उल्हासनगर) या तरुणीने पाडळसे येथील रहिवासी तरुणासोबत पळून जात लग्न केले व ती नंदोईच्या घरी आली. याची माहिती पाडळसेतील रहिवासी तिचा मामा उमाकांत चिंधू कोळी याला मिळाली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तो पिंप्री येथे दाखल झाला व त्याने भाची वैष्णवी हिच्यावर थेट केळी कापणीचा विळा, बक्खीने वार केला.
तिला वाचवण्याकरिता तिची नणंद वैशाली सपकाळे (वय २७) ही धावून आली. तिलादेखील हाताला व डोक्याला दुखापत झाली. वैष्णवी ही उमाकांत कोळी यांच्याकडे लहानाची मोठी झाली व तिने प्रेमविवाह केल्याचा राग उमाकांत याला आल्याने त्याने हे कृत्य केले. नागरिकांनी उमाकांतच्या तावडीतून दोन्ही महिलांना सोडविले व त्यास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. जखमी तरुणीवर व वैशाली सपकाळेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.
वैष्णवीची तब्येत गंभीर असल्याने तिला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. याबाबत यावल पोलिसात रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते. ऐन महिला दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पाडळसे गावातील तरुण व मामाकडे पाडळसे येथे शिक्षणासाठी आलेल्या या तरुणीचे प्रेमसुत जुळल्यानंतर त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे.