जळगाव ( प्रतिनिधी )– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून देण्यात आलेल्या अपंगत्व प्रमाणपत्रावर आक्षेप घेत शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांनी या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे . याच संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवणारा अर्जही त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे दाखल केला आहे.

गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून ६ सप्टेंबररोजी अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ते राज्यातील प्रभावी वलय असलेले दबंग नेते आहेत त्याच दिवशी त्यांनी सरकारी खर्चाने मिळणाऱ्या संरक्षणासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेले अपंगत्व प्रमाणपत्र संशयास्पद वाटते ते ईडीच्या चौकशीला टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्या संरक्षणाला नेमलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले तर या प्रमाणपत्राबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होईल चौकशी करून हे प्रमाणपत्र खोटे निघाल्यास एकनाथराव खडसे यांच्यासह प्रमाणपत्र जारी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी .
गजानन मालपुरे यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे माहिती अधिकारात माहिती मागवणारा अर्ज दाखल करून माहितीही मागवली आहे. एकनाथराव खडसे यांना देण्यात आलेल्या अपंगत्व प्रमाणपत्रासाठी त्यांची तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती त्यांच्या हुद्दा आणि अन्य तपशिलासह द्यावी १२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीतील संबंधित विभागातील व खडसे यांची ज्या कक्षात तपासणी करण्यात आली तेथील सी सी टी व्ही फुटेज मिळावे अशी मागणी त्यांनी केलीय.







