पारोळा तालुक्यात सख्ख्या भावांसह आईविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
पारोळा (प्रतिनिधी) : न्यायालयात खोटी माहिती सादर करून आणि वारसा हक्क डावलून वडिलांच्या मालकीची शेतजमीन व घराची फसवणूक केल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि आईचा समावेश आहे.

तक्रारदार ज्योती संजय सोनार (वय ५०, रा. आसोदा, जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २ सप्टेंबर २०२१ ते १८ मे २०२४ दरम्यान घडली. ज्योती सोनार यांचे दोन भाऊ सोमनाथ विठ्ठल टोळकर (वय ४५), गोविंद विठ्ठल टोळकर (वय ५२) आणि आई शोभाबाई विठ्ठल टोळकर (वय ७२, सर्व राहणार टोळकर गल्ली, पारोळा) यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.संशयित आरोपींनी पारोळा येथील दिवाणी न्यायालयात खोटा दिवाणी दावा (क्र. ११५/२०२३) दाखल केला. यात लबाडीने खोटी प्रतिज्ञापत्रे आणि बंधपत्रे सादर केली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवून, तक्रारदार ज्योती सोनार यांचा वारसा हक्क डावलण्यात आला. मौजे शेवगे बुद्रुक (ता. पारोळा) येथील गट क्रमांक ३९६ मधील २ हेक्टर ५९ आर ही वडिलांच्या नावावरील शेतजमीन आरोपींनी स्वतःच्या नावावर करून घेतली. वडिलांच्या हयातीत पारोळा येथील टोळकर भवन (मिळकती क्र. २३८७) ही मालमत्ता तक्रारदाराची संमती न घेता किंवा हक्कसोड न घेता आरोपी क्रमांक २ (गोविंद टोळकर) याच्या नावावर करून फसवणूक केली.
याप्रकरणी २० जानेवारी २०२६ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोबें हे सपोनि. चंद्रसेन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.









