जळगाव ( प्रतिनिधी ) – लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित मल्हार हेल्प फेअर -४ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जळगावकरांनी उत्साहाने सहभाग नोंदवत सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविले. सेवा आणि सदाचाराने भरलेला एक रविवार जळगावकरांनी अनुभवला.
मल्हार हेल्प फेअर -४ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार चंदूभाई पटेल, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी महापौर विष्णू भंगाळे, विजया मलारा, मिस मल्टीनॅशनल तन्वी मल्हारा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून आय.आर.एस. अधिकारी डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यावर्षी हेल्प फेअरमध्ये ६० समाजसेवी संस्था व २६ सेवामहर्षी सहभागी आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच यावर्षी शासकीय योजनां, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हॉबी डूबी डू विभाग, सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात आला . सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजऋण फेडण्याचे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव जागविणे, तरुणांना सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे.
मल्हार कम्युनिकेशन्सचे आनंद मल्हारा यांनी प्रस्तावना केली हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यावर सेवामहर्षी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला काल ९ सेवाव्रतींना सन्मानित करण्यात आले. हेल्प फेअर-४ च्या दुसऱ्या दिवशी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील टाटा कंपनी आणि मल्हार हेल्प फेअर टीम यांच्या प्रयत्नातून आयोजित या रोजगार मेळाव्यात तरूणांनी सहभाग नोंदवला. ४५ उमेदवारांना टाटा कंपनीतर्फे निवड होऊन नियुक्तीपत्र देण्यात आले.निवड झालेल्या उमेदवारांपैकी १४ मुली आहेत. एकूण १९ सेवामहर्षींना सन्मानित करण्यात आले पहिल्या दिवशी किशोर सुर्यवंशी, अल्ताफ शेख, अजय कामळस्कर, नामदेव वंजारी, प्रमोद झंवर, अनिल अत्रे, रतन बारी, मुरलीधर लुले तर दुसऱ्या दिवशी पुष्पा भंडारी, राजेश वारके, ललिता व डॉ. सुरेश अग्रवाल, संग्रामसिंह सूर्यवंशी, दमितसिंह ग्रोव्हर, दर्शन सुरतवाला, स्व. मेठीदेवी तलरेजा यांचे कुटुंबीय , दीपक परदेशी, साधु कलवाणी या सेवामहर्षींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते आय.आर.एस. अधिकारी डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी अनुभव सांगितले. अधिकारी म्हणूनदेखील समाजाचे देणे लागतो याचे भान मला होते. अनेक प्रयत्नातून मी जनजागृतीत यशस्वी झालो. तेव्हापासून मी जल संसाधन व संधारण यासाठी कार्यरत आहे. हेल्प फेअर म्हणजे अशा काम करणाऱ्या संस्थांना बळ देणारं एक व्यासपीठ. गरजू व दानशूरांना एकत्र आणणारी ही आगळीवेगळी संकल्पना खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यंदा कार्यशाळा आयोजित करण्यात आली ‘स्वयंसेवी संस्थांसाठी प्रसार माध्यमांचा प्रभावी उपयोग’ या विषयावर मुंबई येथील सर्जना मिडीयाचे सीईओ मिलिंद अरोडकर सेवाभावी संस्थांना मार्गदर्शन केले .