मालेगाव (प्रतिनिधी):- नाशिक-सातोड राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सातोड ता. मुक्ताईनगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात चार वर्षांचा चिमुकला देखील ठार झाला आहे.


नाफडे कुटुंब होळी उत्सवानिमित्त देवदर्शनासाठी नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोडकडे कारने येत होते. मालेगावजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.
मृत आणि जखमींची नावे
या दुर्दैवी घटनेत दीपक किशोर नाफडे (३५) (चालक),प्रथमेश दीपक नाफडे (४) (मुलगा), अंकिता संजय नाफडे (१९) या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघातात चालकाचे काका संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पत्नी पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच चिंचवे व उमराणे येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. देवळा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील ३ सदस्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.









