पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाणे येथील घटना
मृताच्या नातेवाईकांना महावितरणकडून धनादेश प्रदान
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाणे येथे मंगळवारी दि. १८ जून रोजी दुर्घटना घडली आहे. सकाळी ९ वाजेच्या सुमारास विहीर दुरुस्तीसाठी उतरलेल्या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान महावितरण कंपनीकडून २० हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतरच मृताचे प्रेत नातेवाईकांनी स्वीकारले.
कैलास युवराज पाटील (वय ४७, रा. भडगाव पेठ, ता. भडगाव) असे मयत मजुरांचे नाव आहे. ते पेठेत परिवारासह राहतात. शेतकऱ्यांच्या शेतात विहीर दुरुस्तीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दि. १८ जून रोजी सकाळी त्यांना पाचोरा तालुक्यात वडगाव मोलाणे येथे दिघी शिवारात एका शेतकऱ्याचा शेतात विहिरीच्या बांधकामासंदर्भात बोलावले होते. विहिरीत काम करीत असताना महावितरणच्या वायरमुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
त्यांना तत्काळ पाचोरा रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. सदर घटनेबाबत पाचोरा पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मजुराच्या मृत्यूयप्रकारणी नातेवाईकांनी आर्थिक मदतीची अपेक्षा शासनाकडून व्यक्त केली आहे. तर हा मृत्यू महावितरणच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याचे सांगून त्यांनी भरपाई द्यावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली आहे.
दरम्यान, पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये नुकसान भरपाई मिळावी अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पुढाकार घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर अधिकारी सागर कदम यांनी पाचोरा रुग्णालयात येऊन नातेवाईकांना प्राथमिक २० हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच आणखी मदतीसाठी कागदपत्रे मागितले असून त्यानुसार प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.