जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल सप्ताहात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांना विविध महसूल विषयक सेवांचा लाभ देण्यासाठी महसूल यंत्रणा गावपातळीवर काम करणार आहे. नागरिकांना महसूल विषयक सेवा देण्यासाठी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.
शासन आपल्या दारी अभियानात शून्य वयोगटापासून ते ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरूष व दिव्यांग व्यक्ती असे सर्वच लाभार्थी या अभियानाचे घटक राहणार आहेत. अभियानात संजय गांधी निराधार योजनेत २६ जुलै ते २८ जुलै या कालावधीत गावनिहाय लाभार्थी यादी तयार करण्यात येणार आहे. २९ जुलै ते ३१ कालावधीत लाभार्थी यादी संबंधित गावातील इंडिया पोस्ट पेमेंटस बँकच्या कर्मचारी, प्रतिनिधीस देण्यात येईल. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत आपली पेंशन आपल्या दारी अंतर्गत गावनिहाय व योजनानिहाय लाभार्थ्यांना घरपोच निवृत्तीवेतन वाटप करण्यात येणार आहे.
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल प्रशासन विविध मोहीमा राबविणार आहे. यात अनधिकृत अकृषिक वापराची प्रकरणे शोधून कार्यवाही करण्याबाबत मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गंत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी शासकीय जमिन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत घरकुलासाठी पात्र भूमिहिन लाभार्थ्यांना तसेच ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प राबविणेसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांमध्ये ॲपद्वारे ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. ई-फेरफार मध्ये एक महिन्यावरील अनोंदणीकृत किंवा नोंदणीकृत नोंदी तसेच तीन महिन्यांवरील नोंदीची निर्गती करण्यात येणार आहे. पोटखराब क्षेत्र लागवडीलायक करण्याची मोहीम राबविण्यात येईल. तलाठी किंवा पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील मयत व्यक्तीची वारसनोंदी घ्याव्यात तसेच मतदार यादी मधून देखील मयतांची नावे कमी करणेबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत कामकाज करण्यात येणार आहे. विविध महसूलविषयक कागदपत्रे विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य शाखेमार्फत सेवानिवृत्ती प्रकरणांमध्ये संबंधित सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रकरणानुसार पेन्शन सुरू करण्याबाबतची मोहीम १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या या पहिल्या टप्प्यात गाव, मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना महसूलविषयक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.