जळगाव शहरातील जयकिसनवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : दुकानाच्या आवारातील कंपाऊंडमध्ये ठेवलेले ४० हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनीयम केबलचे बंडल एका महिलेने चोरून नेल्याची घटना दि. १५ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जयकिसनवाडी परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जयकिसनवाडीमध्ये असलेल्या विशाखा इंटरप्रायजेस या दुकानाच्या कुंपणाच्या आत काही साहित्य ठेवलेले होते. दुकान बंद असताना दि. १५ मार्च रोजी पहाटे एक महिला तेथे आली आणि तिने अॅल्युमिनीयम केबलचे एक बंडल चोरून नेले. या दुकानावर काम करणारे कमलाकर मधुकर बऱ्हाटे (४८, रा. योगेश्वर नगर) हे दुकानावर आले त्या वेळी हा प्रकार समोर आला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक महिला हे बंडल चोरून नेत असल्याचे दिसले. या प्रकरणी बऱ्हाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.