महिलेची सोन्याची पोत लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक
एरंडोल पोलिसांना यश
एरंडोल (प्रतिनिधी) – मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या महिलेची सोन्याची पोत लंपास केल्याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. चोरट्यांकडून अर्धवट तुटलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली.
एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, मिलींद कुमावत, अकील मुजावर यांनी चाळीसगाव येथे जाऊन सापळा रचला. यावेळी आरोपींना संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींचा पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. आरोपींना नाव व पत्ता विचारले असता त्यांचे नाव सैय्यद तोशिब सैय्यद अली (वय-२४वर्षे पिंप्राळा हुडको, जळगांव) व आकाश राजू खरे (वय २० वर्षे, दूध फेडरेशन, जळगांव) असे त्यांनी सांगितले. दरम्यान,दोन्हीं चोरट्यांकडून चोरी झालेली १८ ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धवट तुटलेली पोत हस्तगत करण्यात आली.
एरंडोल येथील विमलबाई लक्ष्मण चौधरी या मॉर्निंग वॉक साठी पहाटे फिरायला जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करून पोबारा केला होता. ही घटना शासकीय विश्राम गृहासमोर गुरूवारी सकाळी घडली होती. दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.