जिल्हा परिषद : लेखी पत्र देऊनही तक्रारदार प्रतिभा शिंदेनी चौकशी समितीकडे फिरवली पाठ
जळगांव (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या बोरमढी येथील एका विवाहितेची रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या गंभीर प्रकरणाची त्रिस्तरीय चौकशी समितीद्वारे सखोल व पारदर्शक चौकशी करण्यात आली आहे. सदर प्रकरणात चौकशी दरम्यान घेण्यात आलेले जबाब, उपकेंद्र कर्जाने येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज या आधारे दोषी आढळलेल्या आरोग्यसेविका व कंत्राटी वाहन चालक यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.
ही चौकशी प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून, प्रकरणातील तक्रारदार प्रतिभा शिंदे यांना आपली बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र संधी व लेखी पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते.(केजीएन) मात्र, वेळेत प्रतिसाद न आल्याने आणि चौकशी अहवाल सादर करण्यासाठी ठरवून दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीच्या मर्यादेत वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे चौकशी समितीने परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करून आपला अहवाल सादर केला आहे.याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता संबंधित १३ जणांचे जबाब, दस्तऐवज व घडलेली घटना यांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई निश्चित करण्यात आली आहे.” (केजीएन)जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा व आपत्कालीन परिस्थितीतील सेवा यामध्ये शिथिलता सहन करणार नाही, असे स्पष्ट संकेत या कारवाईतून देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.