चाळीसगावात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी): शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत भाजीपाला खरेदी करत असताना, दोन अज्ञात महिलांनी एका ५५ वर्षीय महिलेच्या हातातील पिशवी धारदार शस्त्राने फाडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ६१ हजार ४३१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरला सुभाष शेवरे (वय ५५, रा. पवारवाडी, चाळीसगाव) या २७ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास नंदन स्वीट मार्ट ते जुनी नगरपालिका दरम्यान असलेल्या तितूर नदीच्या पुलावर भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीवर डल्ला मारला. संशयित महिलांनी पीडितेच्या हातातील कापडी पिशवी धारदार हत्याराने अत्यंत शिताफीने फाडली. पिशवीत ठेवलेली ३३,६२१ रुपये किमतीची सोन्याची चैन (६.५८० ग्रॅम), २२,८१० रुपये किमतीची सोन्याची अंगठी (५ ग्रॅम), ५,००० रुपये रोख (५०० च्या १० नोटा) असा एकूण ६१,४३१ रुपयांचा माल लबाडीच्या उद्देशाने अज्ञात चोरटयांनी चोरून नेला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सरला शेवरे यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमितकुमार बाविस्कर करत आहेत. भरबाजारात झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपी महिलांचा शोध सुरू केला आहे.









