चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील एका महिलेची ८ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दि. १७ ऑक्टोबर २०२४ ते ९ जून २०२५ या कालावधीत ही घटना घडली असून, या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील स्मिता अतुल महाजन (वय ४३) यांना मोहीत शर्मा आणि आशिष भारद्वाज नावाच्या व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी स्मिता महाजन यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अत्याधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला या ठगांनी स्मिता महाजन यांना खोटा नफा झाल्याचे भासवले. यामुळे त्यांचा विश्वास संपादन झाला आणि त्यांनी अधिक गुंतवणूक करण्यास तयारी दर्शवली.
या विश्वासाचा फायदा घेत, आरोपींनी स्मिता महाजन यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी मोठी रक्कम स्वीकारली. प्रत्यक्षात मात्र कोणताही नफा झाला नाही आणि गुंतवलेले पैसेही परत मिळाले नाहीत, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी स्मिता महाजन यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.