डॉ. केतकीताई पाटील फाउंडेशन चा जागतिक महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम
जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. केतकीताई पाटील फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून मुली व महिलांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आज शनिवार दिनांक ८ मार्च रोजी बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथे मोफत योगासन व प्राणायाम वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास शाळकरी मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
माणसाच्या निरोगी आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम करणे खूप गरजेचे आहे. कुटुंबाच्या जवाबदाऱ्या सांभाळत असताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष होते. त्यामुळे शारीरिक व्याधी तर होतातच परंतु मानसिक स्वास्थ्य देखील खराब होते. त्या दृष्टीने आज महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी मुली व महिलांसाठी प्राणायाम व योग वर्ग आयोजित केला होता.
बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरपंच शारदा पाटील, उपसरपंच दिव्या मतकर, ग्रामपंचायत सदस्य शारदा इंगळे, ज्योती इंगळे, व्यवस्थापन समिती प्रमुख छाया सुरवाडे, उपप्रमुख हिराबाई कोळी, माजी सरपंच बापू दादा देशमुख, योगशिक्षक चैतन्य क्षीरसागर, शाळेचे मुख्याध्यापक अनिल बावस्कर उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पंण पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी योगशिक्षक चैतन्य क्षीरसागर यांनी योग आणि प्राणायामाचे महत्त्व विशद केले. उपस्थित विद्यार्थी आणि महिलांना योगासन आणि प्राणायामाची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले.सदर उपक्रम विद्यार्थी नियमित करतील आणि त्यांच्याकडून करून घेतले जाईल अशी ग्वाही मुख्याध्यापकांनी दिली.
सूत्रसंचालन आणि आभार मुख्याध्यापक अनिल बाविस्कर यांनी मानले.