राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचे परखड मत
महिला औद्योगिक संस्थेत “वारसा स्त्री शक्तीचा” अभियानाचा समारोप
जळगाव (प्रतिनिधी) :- देशभरामध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणात वैचारिक दूषितपणा वाढवण्याचे काम सातत्याने केले जात आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वाला मिळणारे पोषक वातावरण संपवण्याचा घाट घातला जात आहे. अशा वेळेला महिलांनी सातत्याने सजग राहिलं पाहिजे. महिलांची टिंगल टवाळी ज्या वेळेला थांबेल तेव्हाच स्त्री समाजसुधारकांचा वारसा आणखी जोमाने पुढे जाईल, असे प्रतिपादन राज्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागातर्फे आयोजित “वारसा स्त्री शक्तीचा” या राज्यस्तरीय अभियानाचा समारोप जळगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), जळगाव या ठिकाणी शुक्रवारी १२ जानेवारी रोजी घेण्यात आला. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे(नाशिक) उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे(लातूर), महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक (पनवेल), पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील, अनिसचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, आयटीआयच्या शिल्पनिदेशक ज्योती भोळे, जिल्हा महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह सुशीला चौधरी उपस्थित होते.
प्रस्तावनेमधून सुशीला चौधरी यांनी कार्यक्रम घेण्यामागील व अभियानाबाबत उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यानंतर आरती नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सुंदर, निकोप समाज निर्मितीसाठी महिलांनी स्वतःला पुढे नेले पाहिजे. महिलांना सारखे टक्के टोणपे घरातूनच सहन करावे लागतात. महिला चेष्टेचा विषय नसून त्यांनाही समानतेच्या वाटेवर नेण्याची अत्यंत गरज आहे. महिलांनीच महिलांची टिंगल टवाळी टाळली पाहिजे. महिलांना विशिष्ट चौकट लावूनच ओळखले जाते. तसेच सातत्याने तिच्या चरित्राविषयी विचारले जाते. असे का होते ? याबाबत विचार करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
शमीभा पाटील यांनी सांगितले की, विवेकी विचारसरणी अत्यंत महत्त्वाचे आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी यांसारख्या स्त्री समाजसुधारकांचा वारसा पुढे चालवला गेला पाहिजे. माणूस म्हणून सतत स्वतःला जाणीव ठेवत विवेक जागृत ठेवला पाहिजे. महिलांनी स्वतःच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने वैचारिक अधिष्ठान मजबूत केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
सूत्रसंचालन एस. एफ. तडवी यांनी केले. आभार शाखा कार्याध्यक्ष कल्पना चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, अड. योगेश तायडे, जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे व विश्वजित चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी के.व्ही.बिऱ्हाडे, मंदाकिनी महाजन, ए.डी. पुरी, बी.डी. राजहंस, पी.एल. तायडे आदींनी परिश्रम घेतले.