म्हसावद ग्रामपंचायत, सिंधुताई बहुउद्देशीय संस्थेमार्फत आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील म्हसावद येथे ग्रामपंचायत म्हसावद व सिंधुताई बहुउद्देशीय संस्था, म्हसावद यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वा वित्त आयोग योजना अंतर्गत किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. शिका आणि कमवा या उपक्रमामुळे गावातील ७० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमात म्हसावद गावाचे सरपंच गोविंदा पवार, ग्रामविकास अधिकारी भोजराज फालक व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच गोविंदा पवार यांनी आपल्या भाषणातून महिलांनी कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्या शितलताई चिंचोरे यांनी प्रशिक्षणार्थी महिला व मुलींना शिवणकाम/ब्युटीपार्लर व्यवसायातील संधी आणि स्वयंरोजगाराचे महत्त्व व महिलांना आत्मनिर्भर बनण्याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. उदघाटन सोहळ्यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीना शिवणक्लासचे आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले. यामुळे मुलींना प्रशिक्षणादरम्यान लगेचच प्रात्यक्षिक करण्यास मदत मिळाली.
याप्रसंगी सिंधुताई संस्थेचे अध्यक्ष लखन कुमावत यांनी मनोगतात महिला सक्षमीकरणासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वरा ब्युटी पार्लरच्या संचालिका मयुरी मिश्रा, शिवणक्लास प्रशिक्षीका लताताई बडगुजर तसेच संस्थेचे समन्वयक अनिल राठोड, विशाल बडगुजर, म्हसावद बचत गटाचे ललिता पाटील, माधुरी कुंभार यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि प्रशिक्षणार्थिंना शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना नवीन कौशल्ये शिकण्याची आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.