जळगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमोदे खुर्द येथील महिला शेतकऱ्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी १४ हजार ११६ रुपयांचा हप्ता भरला असताना आता त्यांना नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम अवघी ८४० रुपये असल्याचे पोर्टलवर दिसून आले आहे. त्यामुळे संतप्त महिला शेतकऱ्याने आता कृषी विभागाच्या प्रशासनाकडे दाद मागितली आहे.
संगीता ज्ञानेश्वर पाटील असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. रिधूर व आमोदे शिवारातील अनुक्रमे गट नंबर ३२४ व १४८० या ठिकाणी त्यांचे एक हेक्टर १० क्षेत्र आहे. त्यातील ३२४ गटातील ४९ आर क्षेत्रासाठी त्यांनी केळी पीकविमा काढला होता. ऑनलाइन पद्धतीने त्यांनी विमा काढला आणि त्यापोटी १४ हजार ११६ रुपयांचा हप्ताही भरला होता. त्यानंतर अवकाळीसह वादळात केळीचे नुकसान झाले होते. त्यानंतर शासकीय यंत्रणांनी पंचनामाही केला होता. भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या या महिला शेतकऱ्याने ग्रामसेवक, तलाठ्यासह पाठपुरावा केला.
नंतर पोर्टलवर भरपाईची रक्कम दिसून आली. ती रक्कम पाहून त्यांना धक्काच बसला. ८४० रुपयांच्या भरपाईच्या रक्कम पाहून त्यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली. मात्र, कुणीही ठोस उत्तर देत नसल्याने त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. नियमानुसार भरपाईची रक्कम पोर्टलवर दिसावी आणि ती लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी महिला शेतकरी संगीता पाटील यांनी केली आहे. महिला शेतकऱ्याची थट्टा शासनाकडून थांबावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.