चाळीसगाव न्यायालयाचा आदेश
चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल येथील डॉक्टरला रुग्णाच्या विनयभंगप्रकरणी चाळीसगाव न्यायालयाने तीन वर्षे शिक्षा ठोठावली आहे. यामुळे चाळीसगावसह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये २५ ऑक्टोबर २०१९ रोजी पिडीत महिला,आयसीयूमध्ये उपचार घेत होती. डॉ. मंगलसिंग परदेशी यांनी रुग्ण आयसीयूमध्ये एकटी असताना, पीडीतेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी डॉक्टर विरुद्ध भारतीय दंडविधान कलम ३५४ आणि कलम ३५४ अ प्रमाणे गुन्हा दाखल होता. प्रस्तुत प्रकरणात सहाय्यक फौजदार बापूराव फकीरराव भोसले यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते.
प्रस्तुत नियमित फौजदारी खटलाची सुनावणी चाळीसगाव येथील न्यायदंडाधिकारी वर्ग १, न्यायालय क्रमांक २ श्रीमती एस आर शिंदे यांचेकडे सुनावणी झाली. प्रस्तुत प्रकरणात एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आज दि. २२ रोजी संशयित आरोपी डॉ. मंगलसिंग परदेशी यास कलम ३५४ अन्वये. दोन वर्षे सश्रम कारावासची शिक्षा आणि ७ हजार रुपये दंड, तसेच ३५४ अ अन्वये १ वर्ष सश्रम कारावासची शिक्षा आणि रक्कम ७ हजार रुपये दंड करण्यात आला. त्यातून पीडित महिलेस रक्कम रुपये १०,००० नुकसान भरपाई देण्याचा आदेश करण्यात आला.
प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलिंद येवले यांनी कामकाज पाहिले तर संशयित आरोपीतर्फे वसंत ढाके यांनी कामकाज पाहिले. प्रस्तुत खटल्याची पैरवी पो.ना रणजित सोनवणे यांनी केली.तर केस वॉच पो. कॉ.प्रविण देवरे यांनी योग्य ती मदत केली.