महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व नागरिकांच्या मदतीने येत्या काळात चळवळ उभी करावी लागणार असून उपलब्ध असलेल्या स्थानिक खाद्यपदार्थांच्या माध्यमातून बालकांना पौष्टिक आहार देण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात तयार होणारी स्थानिक खेळण्यांना बचत गटांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले.
दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा पोषण अभिसरण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला व हा उपक्रम यशस्वी पणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीला सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा नियोजन भवनात जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागा मार्फत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण महिना जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमात श्री. अंकित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या डाएट चे प्राचार्य अनिल झोपे, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, बाल विकास प्रकल्प अधिकारी रफिक तडवी, सचिन जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आकश चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या रजनी संजय सावकारे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पथनाट्य कलाकार विनोद ढगे यांनी सुपोषित भारत या विषयावर पथनाट्य सादर केले.
माझी अंगणवाडी महिला व बाल विकास केंद्र या नवीन मोबाईल ॲपचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यासोबतच कार्यक्रम स्थळी कुपोषण मुक्तीसाठी पूरक असलेल्या विविध उपक्रमांचे स्टॉल देखील लावण्यात आले होते. या प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी स्टॉलधारक महिलांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले की, देशभर आयोजित करण्यात येणाऱ्या पोषण माह चा उद्देश फक्त कार्यक्रम करणे असा नाही. तर कुपोषण संपूर्णपणे नष्ट करण्याचा आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका या कुपोषण नष्ट करण्याच्या मोहिमेतल्या एक सैनिक असून त्या ग्रामीण भागात घराघरापर्यंत पोहोचल्यास कुपोषणावर नक्की मात करता येईल. कुपोषणाच्या विरुद्ध असलेल्या या लढ्यात ग्रामस्थ तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत देखील प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. खानदेशात अनेक चवीची व पौष्टिक अशी खाद्यपदार्थ घरोघरी तयार केली जातात. या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून लहान बालकांना सकस आहार पुरविता येऊ शकतो. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरगुती पद्धतीची बालकांची खेळणे तयार केली जातात. या स्थानिक उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्या माध्यमातून देखील बालकांचा विकास साधता येऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. प्राचार्य झोपे हे आपल्या मनोगतात म्हणाले की पोषण महा आपल्या योगदानामुळेच यशस्वी ठरू शकतो. अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागात घराघरापर्यंत पोहोचून नवी पिढी घडवण्याचे काम चोखपणे बजावत आहेत. त्यांच्या माध्यमातूनच कुपोषणाविरुद्धचा लढा आपण यशस्वी करू शकतो. जिल्हा कार्यक्रमाधिकारी देवेंद्र राऊत यांनी प्रास्ताविकातून कुपोषण महा या अभियानाबद्दल विस्तृतपणे दिली.
दरम्यान या कार्यक्रमात कुपोषण मुक्तीसाठी लढा देणाऱ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर स्थानिक ग्रामपंचायतींचे सरपंच आरोग्य सेविका यांचा देखील पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करणारे उत्कृष्ट सरपंच म्हणून प्रथम पुरस्कार अमळनेर तालुक्यातील सुंदर पट्टी ग्रामपंचायत सरपंच अर्चना पाटील, तर द्वितीय पुरस्कार जामनेर तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत सरपंच पूजा निलेश पाटील, व तृतीय पुरस्कार धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील सरपंच उषाबाई सोनवणे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी चोपडा तालुक्यातील कर्जाने येथील आरोग्य सेविका विभांगणी ढोमणे, यावल येथील आरोग्य सेविका शीला आर पाटील, आशा वर्कर मंडळी येथील भिकुबाई धनगर, नजमा तडवी, अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील छाया पाटील,भारती पाटील,संगीता शेजवळकर,पुष्पावती कोरे, जानू बारेला, उज्वला माडतरकर यांचे सह इतर अंगणवाडी सेविकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. पोषण आहारात विशेष कामगिरी करणाऱ्या ज्योती समाधान पाटील या अंगणवाडी सेविका यांचा देखील यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अंगणवाडी पर्यवेक्षिका जयश्री दवे, प्रेमलता पाटील,संघमित्रा सोनार तर उत्कृष्ट प्रकल्प म्हणून रावेर व अमळनेर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी यांना प्रमाणपत्र व व ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. अंगणवाड्यांमध्ये रिक्त असलेल्या मदतनीस या पदावर अलीकडेच भरती करण्यात आलेल्या महिला उमेदवारांना देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला व बाल विकास विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अजय पाटील, कक्ष अधिकारी नंदू पाटील व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन श्रीमती अनीता मुगल यांनी केले तर आभार श्रीमती दमयंती इंगळे यांनी मानले.