महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’ उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) – स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान सौदामिनींचा’ हा विशेष कार्यक्रम महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात मंगळवारी (30 सप्टेंबर) मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) मानसी सुखटनकर, व्यवस्थापक (मानव संसाधन) तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व वेगवेगळ्या क्षेत्रात महावितरणचा लौकिक वाढवणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्रंथभेट देऊन प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. महावितरणमधील महिला अधिकारी, कर्मचारीही विजेसारख्या तांत्रिक व अत्यावश्यक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांचे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार अधीक्षक अभियंता पाटील यांनी काढले. कार्यालयीन कामकाजाचा भार सांभाळत अनेक महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कठीण प्रसंगांना तोंड देत महावितरणमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त होत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असल्याचे सहायक महाव्यवस्थापक बुरंगे म्हणाले. यावेळी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महावितरणमध्ये काम करताना येणारे अनुभव कथन केले.