महानगरपालिकेत भाजपा लढणार स्वबळावर ?
जळगाव ( विशेष प्रतिनिधी ) –जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. रविवारी दि. २८ डिसेंबर रोजी सकाळपासून अजिंठा विश्रामगृह येथे सुरू असलेल्या महायुती बैठकीमध्ये एकत्र येण्याची चर्चा आता फिस्कटलेली आहे. भाजप स्वबळावर लढणार असल्याचे आता चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. ना.गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून अर्धवट उठून निघून गेल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे.

भारतीय जनता पक्ष हा महायुती सोबत लढेल असे काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र शनिवारी ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, आम्ही युती संदर्भात चर्चा करत आहोत.रविवारी मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, आ.राजूमामा भोळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये अजिंठा विश्राम येथे चर्चा झाली.
चर्चामध्ये शिवसेनेकडून २५ जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेला १९ आणि राष्ट्रवादीला ६ अशा जागा देण्याबाबत सांगण्यात आले. शिवसेनेच्या आज २५ “विनिंग सीटा” असल्यामुळे शिवसेना कडून हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता महायुती फीस्कटल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
अपेक्षित जागा मिळत नाही म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बैठकीतून अर्धवट उठून निघून गेले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी चर्चा करून जागा वाटपाबाबत व तिकीट वाटताबाबत अंतिम चर्चा केली. यानंतर मंत्री गिरीश महाजन हे पुढील दाराने तर आ. मंगेश चव्हाण आणि आ. राजूमामा भोळे हे मागील दाराने विश्रामगृहातून कोणालाही न भेटता थेट निघून गेले. भाजप ७५ जागा स्वबळावर लढणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झालेले आहे. मंत्री गिरीश महाजन हे कार्यालयातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भेटी घेऊन आता रेल्वेने नाशिककडे रवाना झाले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांना सायंकाळपर्यंत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळाली आहे.









