जळगाव ( प्रतिनिधी ) – सिंधी कॉलनीतील वीजग्राहक पोपटानी यांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित केला आहे. मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे गोपाल पोपटानी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोपटानी कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे, महावितरणची बदनामी करणारे व जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. 23 डिसेंबररोजी पॉवर हाऊस शाखेचे सहायक अभियंता जयेश तिवारी, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे, तंत्रज्ञ नमो सोनकांबळे, कनिष्ठ कार्यालयीन सहायक योगेश जाधव, कंत्राटी कर्मचारी गुणेश ननवरे थकबाकी वसुलीसाठी जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर भागात गेले होते. बिल न भरलेल्या ग्राहकांना सूचना दिल्याने काहींनी बिलाचे पैसे भरले. बिल भरले नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
टिकमदास पोपटानी यांनी 75 दिवसांपासून बिल भरलेले नाही. कर्मचाऱ्यांनी पोपटानी यांना आवाज देऊन घराबाहेर बोलवले व त्यांना बिल भरण्याची विनंती केली. मात्र किशोर पोपटानी यांनी अचानक अभियंता व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.टिकाव अभियंता तिवारींच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पोपटानींच्या हातातून टिकाव हिसकावला. पोपटानींनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात तिवारी व योगेश जाधव यांच्या डाव्या कानाला तसेच नमो सोनकांबळे यांना पाठीला मार लागला. पोपटानींनी दगड उचलून कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी शासकीय कर्तव्य पार पाडताना पोपटानींनी अडथळा आणून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. किशोर पोपटानींवर त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
25 डिसेंबररोजी गोपाल पोपटानी तसेच किशोर पोपटानींच्या पत्नीने पत्रकार परिषदेत अभियंता व कर्मचाऱ्यांवर धादांत खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली. पोपटानी यांच्यावर नियमानुसारच वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. सहायक अभियंता तिवारी यांनी कोणत्याही महिलेस धक्काबुक्की अथवा गैरवर्तन केलेले नाही. 75 दिवसांपासून थकीत असलेले वीजबिल भरण्याची विनंती केल्यावर किशोर पोपटानींनी अभियंता व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी संबंधित रोहित्र तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामागे इतर कोणताही उद्देश नव्हता. गोपाल पोपटानींनी पत्रकार परिषदेत महावितरण व कर्मचाऱ्यांची बदनामी केली, त्यांच्यावर मीटर बायपास करून 78 हजार 140 रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा 20 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल आहे. पोपटानींची वीजचोरी करण्याची व वीजबिल न भरण्याची पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पोपटानींनी आकसबुद्धीने पत्रकार परिषद घेऊन महावितरणची बदनामी व जनतेची दिशाभूल केली आहे, असे महावितरणने म्हटले आहे.