आय. टी. आय. बेरोजगार विद्यार्थ्यांचे आ. शिरीष चौधरी यांना निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) – महावितरण कंपनीमध्ये रिक्त जागा भरल्या न गेल्यामुळे तात्काळ शासकीय पातळीवर प्रक्रिया राबवावी यासाठी आयटीआयच्या बेरोजगार युवकांनी आ. शिरीष चौधरी यांना निवेदन देऊन शासनाकडे लक्ष वेदनांची मागणी केली.
महावितरण कंपनी मध्ये दि ७ जुलै २०१९ रोजी विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक या दोन्ही पदाची भरती करणेकामी उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक जाहिरात महावितरणतर्फे काढण्यात आली होती, यासाठी १ लाखाहून उमेदवारांनी भरती होणेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. या भरतीतील विद्युत सहाय्यक या पदासाठी इयत्ता १० वी. च्या एकूण गुणांवर निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. व उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर निवड करण्यात येणार होती. परंतु उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी दि. २५ ऑगस्ट २०१९ रोजी परीक्षा घेण्यात आली. नंतर १ महिन्याच्या आत निकाल जाहीर करू असे महावितरण प्रशासनातर्फे सांगण्यात आले, परंतु सदरचा निकाल १ महिन्याच्या आत लावण्यात आला नाही, याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तद्नंतर काही दिवसांनी आचार संहिता चालू झाली व लगेच निवडणुका असे कारण पुढे आले. बेरोजगारांचे जवळपास १ वर्ष नोकरीच्या अपेक्षेने वाया गेले.
महावितरण ने २८ जून २०२० रोजी उपकेंद्र सहाय्यक पदाचा निकाल जाहीर केला व १५ जुलै २०२० रोजी कागदपत्र पडताळणीची तारीख जाहीर केली पण महावितरणचे जे अधिकारी कागदपत्र पडताळणी करणार होते त्यांना कोरोनाची भीती होती. बाहेर गावावरून येणारे उमेदवारांपासून संक्रमण होऊ शकतं अश्या प्रकारची भीती अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे १५ जुलै २०२० ही तारीख पुढे ढकलण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आहे ते काम सोडून दिले परंतु त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे याला सर्वस्वी आपले सरकार व महावितरण जबाबदार आहे.
पुन्हा महावितरणने दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी उपकेंद्र सहाय्यक या पदाची अतिरिक्त निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणी करिता व शारीरिक तपासणी अहवालासह दि. १५ व १६ सप्टेंबर २०२० रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले. परंतु दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी महावितरण कडून कोणतेही स्पष्ट कारण न देता ही “कागदपत्र पडताळणी प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात येत आहे” असे कळविण्यात आले. याही वेळी निवड झालेल्या उमेदवारांचा हिरमूड झाला, आणि उमेदवारांनी मिळेल त्या साधनाने खर्च करून आपली शारीरिक तपासणी करून त्याचे अहवाल प्राप्त करून ऐनवेळी महावितरण कडून तपासणी रद्द झाल्यामुळे आर्थिक ताण सोसावा लागला, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी आ. शिरीष चौधरी यांनी तात्काळ ना. नितीन राऊत, उर्जामंत्री यांचेशी पत्रव्यवहार करून याबाबतची माहिती दिली. यावेळी सागर सुरवाडे, शुभम सोनवणे, प्रतिक वानखेडे, प्रवीण तायडे, रोशन कोळी इ. उमेदवार उपस्थित होते.







