निवडणूक आयोगाकडे भरले शुल्क
जळगाव (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले. या यशावर मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आता संशय घेतला आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तीन पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासाठी त्यांनी आवश्यक ते शुल्क देखिल भरले आहे.
राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला. मविआ नेत्यांनी ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त करून बॅलेटपेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ जागा महायुतीने ताब्यात घेतल्या. या निकालावर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही संशय व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अॅड, रोहीणी खडसे यांच्यात लढत झाली होती. त्यात चंद्रकांत पाटील यांनी अॅड. रोहीणी खडसे यांचा पराभव केला.
निकालावर आक्षेप घेत १६ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्या यांच्या सखोल पडताळणीची मागणी महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांनी शुक्रवारी निवडणूक शाखेकडे केली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत त्यांनी रीतसर याबाबतची ७ लाख ५५ हजाराची शासकीय फी देखील भरली आहे. विरोधातील उमेदवाराने दोन दिवस आधीच त्यांना कोणत्या बूथवर किती मतदान मिळेल?, याबाबतची यादी सोशल मीडियात व्हायरल केली होती आणि त्यानुसारच प्रत्येक बुथवर संबंधित उमेदवाराला मते मिळाली आहेत, हे सगळे संशयस्पद असल्याचे अॅड. रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
एरंडोल मतदारसंघाचे शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार डॉ. सतीश पाटील यांनी देखिल ४ ते ५ बुथवरील फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी बुधनिहाय ४५ हजार रूपये शुल्क देखिल त्यांनी भरले आहे. एरंडोल हा मतदारसंघ पूर्वीपासून आमचा बालेकिल्ला राहिला आहे. या निवडणुकीत अगदी आमच्या गावातही आम्ही मायनस कसे राहु शकतो? असा सवाल डॉ. सतीश पाटील यांनी उपस्थित केला आहे. ही प्रक्रियाच संशयास्पद वाटत असल्याने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीची मागणी केली असल्याचे डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.
तसेच पाचोरा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार वैशाली सूर्यवंशी आणि शिंदे गटाचे आ. किशोर पाटील यांच्यातील लढत काट्याची मानली जात होती. मात्र आ. किशोर पाटील यांनी मोठ्या फरकाने वैशाली सूर्यवंशी यांचा पराभव केला. त्यामुळे वैशाली सूर्यवंशी यांनी देखिल निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. आघाडीच्या तीनही उमेदवारांनी केलेल्या या अर्जावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.