कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागात नागरिकांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध महापौर दीपमाला काळे यांनी कठोर पवित्रा घेतला आहे.त्यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार, उपायुक्त (महसूल) धनश्री शिंदे यांनी आज एका पत्राद्वारे सर्व वसुली लिपिक आणि कर्मचाऱ्यांना मालमत्ता कराविषयी कडक सूचना दिल्या आहेत.


मालमत्ता करातील दुरुस्तीसाठी आलेल्या अर्जांवर कार्यवाही होत नसल्याच्या आणि संबंधित मिळकतधारकांना कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी खुद्द महापौरांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केल्या होत्या. तसेच ‘शास्ती माफी योजनेत’ लिपिक रस घेत नसल्याचेही निदर्शनास आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत प्रशासनाने आता दोन दिवसांत प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
प्रत्येक कार्यासनवर प्राप्त झालेल्या अर्जांचा निकाल पुढील २ दिवसांत लावून त्याचा कार्यपूर्ती अहवाल कर अधीक्षक आणि प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे लिपिक अहवाल देण्यास कसूर करतील, त्यांच्यावर अधिनियमातील तरतुदींनुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.
रजेच्या दिवशीही वसुली सुरू राहणार
महानगरपालिकेने ५ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत ‘शास्ती माफी अभय योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त थकबाकीदारांनी लाभ घ्यावा यासाठी वसुली पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशीही वसुलीची कार्यवाही सुरू राहील.
सुटीच्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत भरणा काउंटर सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर न भरणाऱ्या मिळकतींचे नळ कनेक्शन तोडणे, जप्ती आणि अटकाबवणी यांसारखी कठोर कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या आर्थिक हितासाठी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून, यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.









