महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टॉवर चौकातील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून असलेले अतिक्रमण अखेर शुक्रवारी महानगरपालिकेने भुईसपाट केले. महापौर दीपमाला काळे यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याने ही धडक मोहीम राबवण्यात आली.


टॉवर चौक परिसरात श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि बांधकामाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि परिसरातील रस्त्यावर काही व्यक्तींनी अनधिकृतपणे अतिक्रमण करून मोठ्या लोखंडी पेट्या ठेवल्या होत्या. या अतिक्रमणामुळे मंदिराच्या बांधकामासाठी येणाऱ्या सिमेंट, वाळू आणि इतर साहित्याच्या वाहनांना आत येण्यास मोठी अडचण निर्माण होत होती. वारंवार सांगूनही अतिक्रमणधारक जागा मोकळी करत नसल्याने मंदिर प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता.
शुक्रवारी ६ मार्च रोजी सकाळी श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर दीपमाला काळे यांची भेट घेतली. त्यांनी निवेदनाद्वारे मंदिर बांधकामात येणाऱ्या अडथळ्यांची माहिती दिली. निवेदनाची दखल घेत महापौरांनी कोणतीही दिरंगाई न करता अतिक्रमण विभागाच्या पथकाला पाचारण केले आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले.
महापौरांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने तातडीने टॉवर चौक गाठले. यावेळी
मंदिराच्या प्रवेशद्वाराला अडथळा ठरणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यावर ठेवलेल्या पेट्या व इतर अतिक्रमित साहित्य महानगरपालिकेच्या पथकाने जप्त करून कार्यालयात जमा केल्या. संबंधित अतिक्रमणधारकांना कडक शब्दांत तंबी देण्यात आली असून, पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महापौरांचे नागरिकांना आवाहन
या कारवाईनंतर महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकर नागरिकांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, “जैन मंदिराचा हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. येथे रहदारीला अडथळा निर्माण होईल असे कोणीही अतिक्रमण करू नये. जळगाव शहरातील रस्ते वाहनधारकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. यापुढेही शहरात कुठेही असे अतिक्रमण आढळल्यास प्रशासन ते तात्काळ हटवेल आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
या धडक कारवाईमुळे टॉवर चौक परिसरातील रस्ता मोकळा झाला असून, मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल भाविकांनी आणि मंदिर संस्थेने समाधान व्यक्त केले आहे.








