आमदारांच्या उपस्थितीत महापालिकेत अर्ज दाखल
जळगाव प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी महापौरपदासाठी दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी मनोज चौधरी यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ‘केसरीराज’ ने काही तासांपूर्वी दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे.



या निवडीनंतर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “नगरसेवकांनी आपापसातील मतभेद विसरून महापालिकेचा गाडा यशस्वीपणे पुढे न्यावा आणि जळगावच्या विकासाला गती द्यावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जळगाव शहराचा विकास हेच आपले मुख्य ध्येय आहे. “सर्व नगरसेवकांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास जळगावचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण घोषणा प्रसंगी आ. चंद्रकांत सोनवणे, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे उपस्थित होते. यावेळी महायुतीचे सर्व प्रभागांतील उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपमाला काळे आणि मनोज चौधरी यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता जळगाव शहराच्या रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

*महापालिकेत जाऊन भरले दोन्ही उमेदवारांनी अर्ज*
पक्षाच्या बैठकीत दोन्ही नावांची घोषणा झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक आणि उमेदवारांनी उपस्थिती दिली या ठिकाणी अकराव्या मजल्यावर नगरसचिव शुक्ला यांच्याकडे महापौर पदासाठी दीपमाला मनोज काळे आणि उपमहापौर पदासाठी मनोज सुरेश चौधरी या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यानंतर आता दोन्ही उमेदवारांची निवड बिनविरोध मानले जात आहे. अर्ज दाखल करताना आमदार राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण नेते पदाधिकारी उपस्थित होते.









