महापौर, उपमहापौर निवडीची महासभा ६ फेब्रुवारी रोजी !
जळगाव प्रतिनिधी – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीची सभा शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. याबाबतची माहिती लवकरच प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. ऐनवेळी पक्ष श्रेष्ठींकडून कडून नाव जाहीर होईल, अशी माहिती पक्षामधून मिळाली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेचा प्रथम नागरिक अर्थात महापौर हे महत्त्वाचे पद आता कोणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र महापौरपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी निघाले आहे. यासाठी मुख्य दावेदार असलेले प्रमुख उमेदवार प्रभाग क्रमांक ७ येथील दीपमाला मनोज काळे आणि प्रभाग क्रमांक १२ येथील उज्वला मोहन बेंडाळे यांच्यामध्ये स्पर्धा आहे. दोघांनीही पक्षासाठी अनेक वर्षांपासून काम केले आहे. तसेच पक्ष संघटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महापौर पदासाठी ज्येष्ठ अनुभवी आणि जाणते असणाऱ्या नगरसेवकांना संधी मिळावी अशी एकमुखी मागणी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. या दोन्ही प्रमुख दावेदार असणाऱ्या उमेदवारांनी लोकसभा आणि विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षासाठी महत्वाचे कामगिरी बजावली आहे. महापौर व उपमहापौर निवडीसाठी आता ६ फेब्रुवारी तारीख अंतिम झालेली आहे. याबाबतची सूचना महानगरपालिकेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक मनोज सुरेश चौधरी हे एकमेव प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्याशिवाय प्रवीण रामदास कोल्हे, सिंधुताई विजय कोल्हे, आणि विक्रम उर्फ गणेश किसन सोनवणे यांचीही नावे जुने व अनुभवी म्हणून चर्चेत आहेत. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षश्रेष्ठी शुक्रवारी दि. ६ रोजी ऐनवेळी हे नाव जाहीर करतील अशी माहिती दोन्ही पक्षांमधील सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी दि. ३० तारखेपर्यंत अर्ज घेता येणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर ६ रोजी होणाऱ्या महासभेमध्ये प्रथम नागरिक पदाचा फेटा बांधण्यात येणार आहे.








