आ. राजूमामा भोळे यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : समांतर रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. तसेच, महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. तसेच, महामार्गावर गतिरोधक लवकरच बसविले जातील अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ येथे दोन दिवसात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शनिवारी दि. ३१ रोजी सकाळी जनक्षोभ उसळला. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी भेट दिली. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आ. भोळे म्हणाले की, समांतर रस्ते बनविण्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. तर महामार्गावर रस्ते दुरुस्त करून खड्डे बुजविण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशीदेखील बोलणे झाले आहे. तर महामार्गावर गतिरोधक बसविले जाणार आहे.
माजी महापौर जयश्री महाजन यांच्या आरोपांवर बोलताना त्यांनी सांगितले की, अडीच वर्षे महापौर असताना जयश्री ताई यांनी काय काम केले ? समांतर रस्त्याबाबत तुम्ही काही विषय मांडला तरी आहे का हे सांगावे. केवळ आरोप करून उपयोग नाही, असेही आ. भोळे म्हणाले.