चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूरप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथे राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जागेवर लोकनियुक्त सरपंचांनी अतिक्रमण केल्याचे चौकशीत सिद्ध झाले. यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गणेशपूरचे सरपंच चंद्रकांत साहेबराव पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली आहे.
गणेशपूर येथे २०२२ दरम्यान ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत चंद्रकात साहेबराव पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी गणेशपूर येथे राज्यमार्ग २११ लगत गणेशपूर- दसेगाव, दडपिंप्री, देवळी डोणदिगर, हिरापूर ते पाटणादेवी मार्गावर प्रमुख जिल्हा मार्ग ४१ वर गणेशपूर बसस्थानक चौकात सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर त्यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलासाठी वेल्डिंग वर्कशॉपचे दुकान टाकले आहे. ग्रामपंचायत शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत शशिकांत राजेंद्र पाटील आणि नीलेश युवराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक १२८/२०२४ नुसार तक्रार अर्ज दाखल केला होता.
या तक्रार अर्जाची चौकशी व सुनावणी अंती लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पाटील यांनी गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत ३० बाय २५ जागेत अतिक्रमण केले आहे. ही जागा ग्रामपंचायत मालकीची असून, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता, गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव, महावितरण अभियंता चाळीसगाव यांच्या अहवालानुसार तेथे अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे, असे नमूद केले आहे.
सरपंच जागेसंदर्भात कोणतेही मालकी हक्क वा मिळकत वडिलोपार्जित असल्याचे दस्तावेज वा पुरावे सादर करू शकले नाहीत. या सर्व अहवालानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विवाद अर्ज सुनावणी होऊन ७ जानेवारीला अंतिम निर्णयासाठी बंद करण्यात आले. यात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने गणेशपूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकात पाटील यांना अपात्र करण्याचा निर्णय बुधवारी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जाहीर केला. अर्जदार शशिकांत राजेंद्र पाटील आणि नीलेश युवराज पाटील यांच्यातर्फे अॅड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.