रावेर शहरातील घटना
रावेर (प्रतिनिधी) : घरात मद्य पिण्यासाठी लोकांना का घेऊन बसतो याचा जाब विचारल्याच्या कारणावरून नाराज काकाने पुतण्याच्या छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी दिनांक १६ जून रोजी रात्री रावेर शहरात घडली. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हल्लेखोर काकाला पोलिसांनी अटक केली.
रवींद्र दिलीप महाजन (वय ४०) असे जखमी पुतण्याचे नाव आहे. रविवारी दि.१६ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सुभाष उर्फ बाळू गोविंदा महाजन हा काही लोकांबरोबर घरात मद्य पित होता. या वेळेस त्यांचा पुतण्या रवींद्र मुरलीधर महाजन याने संताप व्यक्त केला.
दारूबाबत जाब विचारल्यानंतर काका पुतण्या दोघात वाद झाला. काकाने पुतण्या रवींद्र महाजन याच्या छातीवर चाकू मारल्याने रवींद्र हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी रवींद्र यास रावेर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
याबाबत सुरेखा दिलीप महाजन यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी काकाला अटक केली. तपास पोलीस निरिक्षक आशिषकुमार अडसुळ करीत आहेत.