भुसावळ विभागातील तिघांचा समावेश
भुसावळ (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेच्या ८ कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार” प्रदान केला आहे. मुंबई विभागातील २, भुसावळ विभागातील ३, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी १ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौतुकासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले.
ऑगस्ट ते ऑक्टोबर – २०२३ या महिन्यामध्ये ड्युटी दरम्यान सतर्कता राखून अनुचित घटना टाळण्यात आणि ट्रेन ऑपरेशनमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांचे योगदान आहे. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रु.२०००/- रोख इ. समावेश आहे. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई विभागमधून ट्रॅकमन धर्मेंद्र कुमार, कनिष्ठ अभियंता ऋषिकेश काकडे, भुसावळ विभागातून टॉवर वॅगन पायलट मो. एजाज खान, किमन श्री. अर्जुन, उप. स्टेशन मॅनेजर, के.एम. पाटील, नागपूर विभागमधून कनिष्ठ अभियंता एस राजू मलय्या, पुणे विभागमधून वरिष्ठ विभाग अभियंता/स्थायी मार्ग शैलेंद्र त्रिपाठी, सोलापूर विभागमधून तंत्रज्ञ ए मुथुस्वामी यांचा समावेश आहे.
महाव्यवस्थापकांनी भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रवृत्त केले जाईल. कार्यक्रमात एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, एस. एस. गुप्ता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, राजेश अरोरा, मुख्य मुख्य अभियंता, सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता आणि एन. पी. सिंग, प्रधान मुख्य विद्युत अभियंता यावेळी उपस्थित होते.
भुसावळ विभागातील कर्मचाऱ्यांची कामगिरी
• श्री. मो. एजाज खान, टॉवर वॅगन पायलट, बुरहानपुर, भुसावळ विभाग, दि. २८.९.२०२३ रोजी कर्तव्यावर असताना, एकाच मार्गावरील स्टार्टर आणि अॅडव्हान्स स्टार्टर सिग्नल दरम्यान बफर पडलेला दिसला. त्यांनी त्वरित टॉवर वॅगन थांबवून सर्व संबंधितांना माहिती दिली आणि स्वत: बफर काढला. त्यांची सतर्कता आणि तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
• श्री. अर्जुन, कीमन, मांडवा, भुसावळ विभाग, दि. ११.९.२०२३ रोजी ड्युटीवर असताना, रुळाखालील खडी आणि २ स्लीपर गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली. येणारी पंजाब मेल होम सिग्नलवर थांबवण्यात आली आणि ट्रॅकचे संरक्षण करून ट्रेन सावधपणे पुढे नेण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
• श्री. के.एम. पाटील, उप. स्टेशन मॅनेजर, कुरुम, भुसावळ विभाग दि. १९.९.२०२३ रोजी ड्युटीवर असताना, सिग्नल्सच्या देवाणघेवाणी दरम्यान, गुड्स ट्रेनच्या २३व्या वॅगनमध्ये हॉट एक्सल दिसला. पुढे अपग्रेडेशन असल्याने, माना स्टेशनवर ट्रेन थांबवण्यात आली जिथे वॅगन आजारी असल्याचे चिन्हांकित केले गेले आणि समस्या सोडवली गेली. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.