चोरवड सीमा तपासणी नाक्यावर रावेर पोलिसांची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) :- मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटखा पोलिसांच्या गस्ती पथकाने चोरवड सीमा तपासणी नाक्यावर बुधवारी मध्यरात्री पकडला आहे. यात ८ लाख रुपयांच्या चारचाकी वाहनासह १४ लाख रुपयांचा गुटखा असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.(केसीएन) पोलीस निरीक्षक डॉ. जयस्वाल यांनी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकातील उप निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस कर्मचारी विशाल पाटील, रवींद्र भांबरे यांना चोरवड नाक्यावरून रावेरकडे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नाकाबंदी सुरु असतांना रात्री २ वाजता महिंद्रा बोलेरो हे चारचाकी वाहन येताना दिसले.
हे वाहन थांबवून चौकशी केली असता त्यात १४ लाख १ हजार १६० रुपयांचा महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला विमल कंपनीचा गुटखा आढळून आला. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता बऱ्हाणपूर येथील एका गोडावून मधून हा गुटका दिल्याची माहिती वाहन चालकाने दिली. याप्रकरणी वाहनचालक रिजवान शेख रउफ व त्याचा साथीदार शेख शोएब शेख शरीफ (दोघे रा छत्री चौक, पठाण वाडी, फैजपूर ता यावल) यांच्या विरुद्ध पोलीस कर्मचारी संभाजी बिजागरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ०४, ६५१५), किंमत ८ लाख रुपये व १४ लाख १ हजार १६० रुपयांचा गुटखा असा एकूण २२ लाख १ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस कर्मचारी विशाल मेढे विशाल पाटील, रवींद्र भांबरे, सचिन घुगे, संभाजी बिजागरे यांच्या पथकाने केली आहे.