एका जणांला बंदूक दाखवून ७० हजार लुटल्याची माहिती
पोलीस घटनास्थळी दाखल ; सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा येथील गावामध्ये अज्ञात दोन ते तीन गुन्हेगारांनी बंदूक घेऊन तोडाला रुमाल बांधून दुचाकीवर येऊन दहशत माजवल्याची घटना शुक्रवार दि. १४ जून रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेत एका जणांला बंदूक दाखवून त्याच्याकडून ७० हजार रुपये लुटल्याचीही माहिती मिळत आहे. तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
असोदा गावामध्ये संध्याकाळी ५ वाजेच्या नंतर अचानक तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर दोन ते तीन गुन्हेगार आले. त्यांच्या हातात बंदुक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले व गावात ते ग्रामपंचायत जवळ आरडाओरडा करत तेथे एका जणांला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून ७० हजार रुपये लूट केल्याची माहिती मिळाली.
घटनेची जळगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी गावामध्ये जाऊन तपासणी केली. यामध्ये लूट झालेल्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद देण्याबाबत सूचना पोलिसांनी केली. तसेच गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान सदर घटनेमुळे गावात दहशत पसरली असून जोवर फिर्याद दाखल होत नाही तोवर अधिकृत सांगता येणार नाही, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.