अमळनेर येथील हिंगोणे खुर्द गावातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणाऱ्या चार जणांनी एका तरूणाला पकडून लोखंडी रॉडने हातापायाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १६ एप्रिल रोजी मारवड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावात विजय योगराज कोळी (वय २४) हा तरूण परिवारासह राहतो. रविवारी १३ एप्रिल रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे वासुदेव नामदेव कोळी, राजेंद्र सुरेश कोळी, किरण आधार कोळी, महेंद्र भावलाल ठाकरे यांनी लोखंडी रॉडने विजय कोळी याच्या हातापायावर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा भाऊ गोपाल कोळी याने भांडण सोडवून तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याबाबत विजय कोळी यांनी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी वासुदेव नामदेव कोळी, राजेंद्र सुरेश कोळी, किरण आधार कोळी, महेंद्र भावलाल ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.