जळगाव ( प्रतिनिधी ) – लॉंड्री चालवणारा तरुण घरफोडीतील आरोपी असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले आहे. कपील वाघ असे घरफोडीतील अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पारोळा येथील रहिवासी आहे. पारोळा शहरातील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पारोळा शहरातील पंचायत समितीच्या बाजुला रुद्र लॉंड्री आहे. कपील दिलीप वाघ (रा. पेंढारपुरा पारोळा) हा तरुण त्या लॉंड्रीचा चालक आहे. लॉंड्री कामानिमीत तो घरोघरी जावून इस्त्री व धुलाईचे कपडे जमा करत होता. धुलाई व इस्त्रीच्या कपड्यांचे संकलन व वितरण करण्याकामी त्याचे अनेकांच्या घरी जाणे येणे होते. या निमीत्ताने तो बंद असलेल्या घरांची पाहणी करत होता. या पाहणीत व टेहाळणीत तो चोरी करावयाच्या घरांची निवड करुन ठेवत होता.
दिवसा लॉंड्रीचे काम आटोपल्यानंतर रात्री त्याचे चोरीच्या कामाचे दुसरे युनिट सुरु होत असे. घरफोडी केल्यानंतर तो मिळालेल्या पैशात हौसमौज पुर्ण करत होता. लॉंड्री चालकाच्या वागण्यात व राहणीमानात झालेला बदल एलसीबी पथकाच्या नजरेतून सुटला नाही. पारोळा शहरात सातत्याने होत असलेल्या घरफोड्यांचे प्रकार लक्षात घेत एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथक रवाना केले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकाला कपील वाघ याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले.
कपील वाघ याला ताब्यात घेत विचारपुस केली असता त्याने पारोळा शहरात केलेल्या दोन घरफोड्यांचा गुन्हा कबुल केला आहे. त्याच्या ताब्यातून पथकाने पंधरा हजार रुपये हस्तगत केले आहे. पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, दिपक पाटील, पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, किरण धनगर, भगवान पाटील, पो.कॉ.सचिन महाजन, चालक दिपक चौधरी, पो.ना. अशोक पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला.