नशिराबादला मविआचा मेळावा
जळगाव (प्रतिनिधी) : लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार, दि.२६ रोजी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, रा. कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, माजी सरपंच तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ चव्हाण, माजी जि.प. सदस्य रवी देशमुख, राष्ट्रवादीचे बरकत अली, रमेश पाटील, बंडूदादा रत्नपारखी, रमेश चव्हाण, मनोज चौधरी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष उन्मेष पाटील यांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना गुलाबराव देवकर म्हणाले की, भाजप काँगेसला ७० वर्षाचा हिशोब मागते. त्यांनी ७० वर्षात काय केलं त्यापेक्षा तुम्ही १० वर्षात काय केलं? याचा हिशोब द्या. १० वर्षात देशाची काय प्रगती झाली, हे जनतेला समजले आहे. काही वर्षांपूर्वी कापसाला ७ हजाराचा भाव मिळावा म्हणून, उपोषण, आंदोलन करण्यात आले. आता तर तुमचं सरकार आहे, द्या कापसाला भाव, असे आवाहन करून रोजगार नसल्याने तरुण उध्वस्त आणि शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. शेतकऱ्याला उध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून सुरु असल्याचा आरोप माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर याची केला. मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार दीपक पाटील यांनी केले.