अमळनेर तालुक्यातील तरुणाला दीड वर्षात मिळाला न्याय
जळगाव (प्रतिनिधी) : रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन एक पाय गमवावा लागलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी संदीप नारायण वानखेडे यांना लोक न्यायालयाच्या माध्यमातून तब्बल २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. हा अपघात १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जामनेर-अमळनेर रस्त्यावर झाला होता, ज्यात त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आणि डंपर पायावरून गेल्याने डावा पाय मांडीपासून कापण्याची वेळ आली होती.
संदीप वानखेडे हे त्यांच्या मित्रासोबत मोटारसायकलवरून अमळनेरकडे जात असताना, धामणगाव रोड येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर (क्र. एम.एच. १९ झेड ८११५) वरील चालकाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात संदीप गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की उपचारादरम्यान त्यांना त्यांच्या डाव्या पायाला कायमचे गमवावे लागले. त्यांच्या उपचारावर जवळपास ५ लाख रुपयांचा खर्च आला होता. या अपघातानंतर संदीप वानखेडे यांनी डंपरचे चालक, मालक आणि विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्याविरुद्ध जळगाव येथील मोटार अपघात नुकसान भरपाई प्राधिकरणाकडे ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. हा महत्त्वपूर्ण दावा १२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्यात आला.
अर्जदाराच्या वकिलांनी संदीप वानखेडे यांची बाजू प्रभावीपणे मांडली. अपंगत्वामुळे झालेले कायमस्वरूपी नुकसान आणि उपचाराचा खर्च लक्षात घेऊन त्यांनी २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव लोक न्यायालयाच्या पॅनलसमोर ठेवला. चर्चा आणि यशस्वी तडजोडीनंतर, विमा कंपनीने संदीप वानखेडे यांना अपंगत्व आणि नुकसान भरपाईपोटी २२ लाख रुपयांची रक्कम देण्याचे मान्य केले. जिल्हा न्यायाधीश-२ एस.एन. राजुरकर (पॅनल अध्यक्ष) आणि ॲड. शरद सोनवणे (पॅनल सदस्य) यांच्या पॅनलसमोर हा महत्त्वपूर्ण हुकूमनामा करण्यात आला. अवघ्या दीड वर्षात या दाव्याचा निकाल लागल्यामुळे जखमी अर्जदार संदीप वानखेडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. अर्जदारातर्फे ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव, ॲड. सुनिल चव्हाण यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे ॲड. रेखा कोचुरे यांनी कामकाज पाहिले.









