जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील चौघुले प्लॉट परिसरात कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण करून लोखंडी सुरीने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी ६ एप्रिल शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चौघुले प्लॉट येथे राहूल ताराचंद गुरव हे पत्नी ममता गुरव यांच्या सोबत वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून पती व पत्नीत कौटुंबिक वाद होता. दरम्यान, शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहूल गुरव यांचे पत्नी ममतासोबत वाद झाला. त्यानंतर राहूलने पत्नीला बेदम मारहाण केली. तर घरातील लोखंडी सुरीने वार करून जखमी केले.
जखमी झालेल्या ममता गुरव यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता महिलेने पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पती राहूल गुरव याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मराठे हे करीत आहे.