जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरातील घटना
बोदवड (प्रतिनिधी) :- शहरातील वंजारी वाड्यात घराचे बांधकाम सुरु असून येथे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. स्लॅब टाकताना वर जाणारी क्रेन अचानक तुटली. यावेळी जेवणासाठी घरी जात असलेल्या तरुणाच्या अंगावर क्रेनचा भाग पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ डिसेंबरला घडली. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश नारायण पालवे (वय ३७, रा. वंजारी वाडा, बोदवड) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. प्रकाश पालवे याच्या घरची परिस्थिती हलाखिची आहे. तो कपाशीची गाडी भरण्यासाठी गेलेला होता. त्यानंतर दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तो जेवण करण्यासाठी घरी जात होता. घराजवळच शेजारी बांधकाम चालू होते. स्लॅब टाकण्याचे काम क्रेन मशीनने सुरू होते. प्रकाश हा घरी जेवणाला जात असताना लोखंडी क्रेनचा छावडा अचानक त्याच्या अंगावर तुटून पडला. यात त्याचा मृत्यू झाला.
गावातच काम असल्याने दुपारी जेवण करण्यासाठी येणार असल्याचे सांगून प्रकाश गेला होता. यामुळे पत्नी घरी जेवणासाठी वाट पाहत होती. परंतु घरी जेवणाला जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश याच्या पक्षात पत्नी व लहान मुलगी आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रवींद्र गुरसळ करीत आहेत.