नवी दिल्ली : देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतरही देशात कोरोना बाधितांची संख्या केल्या कमी होत नाही उलट रोज झपाट्याने वाढतच आहे. देशात मागील 24 तासांत नवे 5242 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जे एका दिवसात आतापर्यंतचे आढळून आलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 157 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 96 हजार 169 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 3029 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36 हजार 824 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 13.6 दिवसांवर आला आहे. तर मागील 14 दिवसांत हा दर 11.5 वर होता.
देशात रविवारी कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, मृत्यूदरात घट होऊन 3.1 टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर 37.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.